मुरगूड ( शशी दरेकर ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे एक कुटुंब आहे. कदाचित काही थोडेसे मतभेद निर्माण झाले असतील पण अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंब एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही . आणि शरद पवार साहेबच नेते आहेत अन राहतील असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला .
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल येथे मुरगूड शहर राष्ट्रवादीतर्फे त्यांचा नागरी सत्कार केला.
यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, शेंडा पार्कमध्ये एक हजार बेडचे सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहे.
तसेच मुरगुडला सर्व सोईनीयुक्त ५० खाटांचे हॉस्पिटल करून दाखवू असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले ,विक्रमसिंह घाटगे यांचा संयमीपणा आणि सदाशिवराव मंडलिकांचा आक्रमकपणा माझ्या अंगामध्ये आला. या दोन्ही गुणावर आजपर्यंत कागल तालुक्यातचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली . आठव्यांदा मंत्री झालो . मंत्रीपदामुळे मातलो नाही. ४० वर्षे सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली .जोपर्यंत विधानसभेच्या रिंगणात आहे .तोपर्यंत सर्व जनता सातत्याने माझी पाठराखण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बिद्री साखरचे चेअरमन के पी पाटील म्हणालेमाझ्या राजकीय जीवनात मुस्लिमांचा सिंहाचा वाटा आहे .जिल्ह्यात आता हसन किसन म्हणजे एका जणांच्या दोन बाजू आहेत .प्रवीणसिंह पाटील म्हणाले, शेतकरी फार अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ करता येते काय, हे श्री. मुश्रीफ यांनी पाहावे. प्रताप ऊर्फ भैय्या माने, महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे, विजय काळे, दिग्विजय पाटील, सरपंच वेदिका गायकवाड यांची भाषणे झाली.
नाविद मुश्रीफ , युवराज पाटील, गणपतराव फराकटे , सुहासिनीदेवी पाटील, सूर्यकांत पाटील, शशिकांत खोत, अॅड. जीवन शिंदे, विकास पाटील, मनोज फराकटे, धनाजीराव देसाई, प्रवीणसिंह भोसले, देवानंद पाटील, वसंतराव शिंदे, एकनाथ देशमुख आदी उपस्थित होते. स्वागत अॅड. सुधीर सावर्डेकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत जाधव यांनी केले. सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले . तर आभार सम्राट मसवेकर यांनी मानले.
दोन विधानसभा, लोकसभा अन तिथे एकदा मंत्री व्हायचा विचार
उमर थका नही सकती, ठोकरे गिरा नही सकती,अगर जिद्द हो जितने की,तो हार भी हरा नही सकती,हार गये मुझे हरानेवाले,क्योंकी, उनके पास मुझे गिराने की साजिश थी, और मुझमें…..खडा होने का जज्बा था अशी शेरोशायरी म्हणत अजुन दोन विधानसभा , लोकसभा अन तिथे एकदा मंत्री व्हायचा विचार आहे. जोपर्यत तुमचा आशीर्वाद , पाठिंबा माझ्या पाठिशी आहे. तोपर्यत अपराजित राहण्याचा चंग मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविला.
ईडीमुळे पाठिंबा नाही
ईडीच्या भीतीमुळे पाठिंबा दिलेला नाही . कोर्टातून दिलासा मिळालेला मी एकमेव आहे . कुणालाच कोर्टाने दिलासा दिलेला नाही . येत्या काही महिन्यात कोर्टाकडून मला न्याय मिळेल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.