सध्याच्या काळात काही मंडळी भौतिक सुखे मिळतात, भरपूर पैसा मिळतो म्हणून राजकारणात येतात. राजकारणात आल्यावर आपल्याला झटपट श्रीमंत होता येतंच पण काही सन्मानाची पदेही मिळतात. म्हणजेच पैसा आणि पद असा दुहेरी फायदा होतो. शिवाय पै-पाहुण्यांचे, मुलाबाळांचे कल्याण करता येते असे वाटते. राजकारण आता लोकांचा व्यवसाय झाला आहे. शून्य भांडवलातून हा व्यवसाय चालू करता येतो. शिवाय यशस्वी होता येते. लोकसंग्रह हाच राजकारणाचा आधार असून तो लोकसंग्रह कोणत्याही मार्गाने जमा केला तरी चालतो. राजकारणातून खूप काही मिळते याचा पावला पावलाला अनुभव येतो. त्यामुळे भांडवलदारांच्या मध्ये अनेक राजकारण्यांची नावे दिसतात. दहा भांडवलदारांची नावे काढल्यास त्यामध्ये पाच राजकारणी व्यक्ती आढळतील. काही राजकारणी स्वतः भांडवलदार नसतील पण ते भांडवलदारांच्या व्यवसायातील भागीदार असतील. आता या देशात भांडवलदार राजकारण्यांची एक स्वतंत्र जमातच तयार झालेली दिसते. त्यामुळे बाकीच्या लोकांना तोच एक खरा मार्ग आहे असे वाटू लागले.
राजकारणाला उद्योगाचे स्वरूप आले असल्याने व प्रचंड संपत्ती मिळत असल्याने काही श्रीमंत घरंदाज राजेराजवाड्यांनाही आपल्या श्रीमंतीचा विसर पडून राजकारणाचे आकर्षण वाटते. हे राजे लोक विशेषता सत्तेच्या बाजूला राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना राजकारणापेक्षा आपली संपत्ती कशी वाचेल याचा ते विचार करतात. राजेराजवाड्यांची अनेक घराणी देशातील राजकारणात सक्रीय झालेली दिसतात. राजकारणामुळे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळता येते. शिवाय गोरगरिबांची दुःखे जवळून समजून घेता येतात व त्यांना मदतही करता येते. देशातील प्रसारमाध्यमे राजकारण्यांना प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी देत असल्याने सर्वजण या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत आहेत. भ्रष्ट राजकारण्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी नोकरशाही त्यांचा भक्कम पाठिंब्याचा आधार घेऊन भ्रष्टाचार करायला सोकावलेली दिसते. एकंदरीत भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट नोकरशाही या लोकशाही प्रदान देशाचे लचके तोडत आहेत. ते देशातील लोकांचा विश्वासघात करीत आहेत. तरी देशातील जनता या भ्रष्ट लोकप्रतिनिधींना लायकी नसताना वर्षानुवर्ष मते देत आली आहे.
सध्या देशातील वातावरण अगदीच गढूळ झाले आहे. भ्रष्टाचाराचा महाराक्षस भारतात ठ थैमान घालत आहे. महागाईने कळस गाठला असून गेल्या पंच्याहत्तर वर्षातील वस्तूंच्या दराचे रेकॉर्ड मोडले आहे. माणसाची उपासमार होत असून त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. आमच्या महागाईची तुलना पाकिस्तान किंवा श्रीलंके बरोबर करून राज्यकर्ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. एका बाजूला केंद्रातील सत्ताधारी मंडळी भारत आता विश्वगुरू झाला आहे असा खोटा डांगोरा पिटत आहेत तर दुसऱ्या बाजूला जनता महागाईच्या वणव्यात होरपळत आहे. हे मतलबी राजकारणी प्रगतशील भारताची तुलना उद्ध्वस्त झालेल्या देशाबरोबर करून देशाचा अपमान करीत आहेत.
महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीय तेढ, कश्मीरचा प्रश्न, सीमेवरील सतत होणारे आक्रमण, नोकरशाहीचा अप्रमाणिकपणा आणि राजकारण्यांचा चाललेला खेळ यामुळे हा देश कमकुवत होत चालला आहे. राष्ट्रहिताचा विचार बाजूला पडलेला दिसतो. मताची खरेदी विक्री जोरात चाललेली आहे. आमच्या पूर्वजांनी देशासाठी त्याग केला पण आता भोग घेण्याचा एकमेव कार्यक्रम चालू आहे. राजकारणात तत्त्वज्ञानापेक्षा पैशाला महत्त्व आलेले आहे. एखादा ध्येयवादी, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांना सध्याच्या राजकारणात स्थान नाही. ते राजकारण टिकूही शकत नाहीत. एकंदरीत सर्वत्र राजकारणाचा दर्जा घसरलेला दिसतो. नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला असून नैतिकता रसातळाला गेलेली दिसते.
आता विश्वगुरू म्हणून संबोधलेल्या देशाचे खरे वास्तव काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विकासाच्या नावाखाली शासनाचा प्रचंड मोठा निधी ठेकेदार आणि राजकारण्यांच्या घराकडे चालला आहे. विकास राज्यकर्त्यांच्या घरात लपून बसला आहे असे चित्र आहे. या देशातील राबणारा शेतकरी, राबणारा कामगार आणि देशातील गरीब जनता लपून बसलेल्या विकासाला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु राज्यकर्ते आणि नोकरशाहीचे संरक्षण असलेने तो कुणालाही दिसत नाही. निवडणुकीच्या काळात मात्र तो राजकारण्यांच्या घरात असावा असा संशय येतो. परंतु निवडणूक होताच तो पुन्हा गायब होतो. अलीकडे देशातील पायाभूत सेवा नष्ट करण्याचे काम चालू आहे. सरकारी प्रसार माध्यमांची आपण वाट लावली. बीएसएनएल सारख्या टेलिफोन कंपनीची आपण मोडतोड करून खाजगी कंपन्यांना वाट करून दिली.
पैसे देऊनही रेंज येत नाही आणि तक्रारही करून चालत नाही. ती खाजगी असल्याने ऐकतही नाही. आपण शासनाच्या एकेक कंपन्या बंद पाडून पुढाऱ्यांच्या पाठीमागे पळत आहोत. त्यांना कंपन्या बंद पाडल्याचा जाब न विचारता त्यांच्याच जिंदाबादच्या घोषणा मोठ्याने देत आहोत. पंच्याहत्तर वर्षांमध्ये विकास मुंगीच्या पाठीवरून पाठविला असता तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असता. पंचवीस वर्षांपूर्वी तहान लागल्यावर आपल्याला रस्त्यावर स्वच्छ व निर्मळ पाणी प्यायला मिळत होते. ते शुद्ध पाणी आपल्याला बाटली मधून विकत घ्यावे लागते. आपण सरकारी शाळा बंद पाडल्या आणि आपले लागेबंधे असलेल्या पुढार्यांधच्या शाळेना परवानगी देऊन त्यांना पैसे मिळवण्याचे स्रोत निर्माण करून दिले. आता गरीबाची मुले पैसे मोजल्याशिवाय शिक्षण घेऊ शकत नाहीत. कर्ज काढून शेती करणारा शेतकरी तोच जगाला पोसतो. त्याच्या डोकीवरील कर्जाचा बोजा कमी होत नाही आणि तो कर्ज डोक्यावर घेऊनच मरतो. कर्जबाजारी बापाच्या तेराव्यासाठी त्याच्या मुलाला कर्ज काढावे लागते व मुलाला वारसा हक्काने सातबाराच्या नोंदीवर कर्जाचा बोजा नोंदवून घ्यावा लागतो. शेती सोडून शेतकऱ्याला पळवून लावण्याचे कटकारस्थान चालू आहे. कुण्या उद्योगपतीने हजारो एकच जमीन खरेदी केली अशी बातमी आम्हाला वाचावी लागते. उद्या ठरवलं तर हे भांडवलदार दलालाच्या मदतीने पृथ्वी सुद्धा खरेदी करू शकतील. भारत विश्वगुरू आहे कोण म्हणत असतील तर निदान त्यांनी त्या दिशेने जाण्याचा तरी प्रयत्न करावा.