कोल्हापूर, दि. 18 : ज्या सार्वजनिक न्यासांनी अद्यापपर्यंत मागील प्रलंबित व दि. 31 मार्च 2021 पर्यंतच्या त्यांच्या अद्यावत वार्षिक हिशोबपत्रकांचे लेखापरीक्षण केलेले नाही, त्यांनी ते तात्काळ करुन घ्यावे व लेखापरिक्षित वार्षिक हिशेबपत्रके कोणत्याही परिस्थितीत दि. 25 जुलै पर्यंत संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन दाखल करावेत, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 32, 33 व 34 अन्वये अनेक नोंदणीकृत न्यासांची, त्यांच्या वार्षिक हिशोबपत्रकांचे अद्याप लेखापरिक्षण करुन घेऊन, संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केलेली नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर असून ती महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 66 व 67 अन्वये दंडनीय आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 मधील तरतुदीनुसार संस्थांनी वार्षिक हिशोब सादर न करणे हा दंडणीय अपराध असून नोंदणीकृत न्यासांनी तात्काळ वार्षिक हिशेबपत्रकांचे लेखापरीक्षण करुन ते धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करावेत.