मुरगूड (शशी दरेकर) : येथील श्री दूधगंगा सहकारी साखर कारखान्याला सन २०१९-२० हंगामाकरिता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचा महाराष्ट्राच्या दक्षिण विभागातून हा पुरस्कार देण्यात आला . कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार प्रदान समारंभाच्यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक उपस्थित होते. पारितोषीक देताना माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांचेकडून कारखान्याच्या चालू हंगामात सर्वात जास्त ऊसदर प्रतिटन ३११६ रुपये अदा केल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतूक केले.
प्रथम परितोषिकासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून निवड
कारखान्याने गेल्या सन २०१९-२० गळीत हंगामात ६ लाख ६७ हजार ५२७ मे. टन ऊसाचे गाळप करुन ८ लाख ५८ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सरासरी साखर उतारा १२.८५ मिळाला. या गळीत हंगामात गाळप क्षमतेचा १२५ टक्के वापर झाला आहे. ऊसतोडणी वहातुक यंत्रणेचा पुर्ण क्षमतेने वापर केला. हंगामात कारखाना बंद राहणार नाही याची काळजी घेतली असून बंद वेळेचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. इंधन वापर कमी केला आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारी उर्जा बचत केली आहे. उपपदार्थ प्रक्रिया प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालविला तसेच रिड्युस्ड ओव्हरआँल रिकव्हरी ८७.२१ टक्के राहिली आहे. या सर्व कामांची पडताळणी करुन कारखान्याची या प्रथम पारितोषीकासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार म्हणजे कष्टकरी सभासदांचा सन्मान – अध्यक्ष के. पी. पाटील बिद्री साखर कारखाना हि लाखो शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे जिवनमान उंचावण्याचे काम झाले आहे. कारखान्याने ऊस सर्वाधिक ऊसदर, उच्चांकी साखर उतारा व वीज उत्पादन यामध्ये कायमच आघाडी ठेवली आहे. यापुर्वी या कारखान्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१९-२० या हंगामासाठी मिळालेला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा ऊस उत्पादक, सभासद व कष्टकरी कामगार यांचा गौरव करणारा आहे. हा पुरस्कार त्यांना मी समर्पित करत आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी या संस्थेच्या वतिने दि. ४ व ५ जून २०२२ रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले. यापरिषदेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, रोहीत पवार यांच्यासह सहकार क्षेत्रातील प्रमुख उपस्थित होते.