सीपीआर रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मधुमेह असूनही रुग्णाला लावले ‘शुगर’चे सलाईन!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) गलथान आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णाला मधुमेह (डायबेटिस) असतानाही उपचारादरम्यान ‘शुगर’चे (डेक्स्ट्रोज – SP-D25) सलाईन लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. योगेश विठ्ठल माने (वय ४०, रा. वसई, मुंबई) असे या रुग्णाचे नाव असून, त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Advertisements

योगेश माने हे गेल्या चार दिवसांपासून सीपीआर रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या (वॉर्ड क्र. ०२) वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल आहेत. माने यांना मधुमेहाचा त्रास आहे. याबाबत डॉक्टरांनी उपचारपत्रावर (केस पेपर) स्पष्ट नोंद केलेली असतानाही, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांना चक्क डेक्स्ट्रोज (साखरयुक्त) सलाईन लावण्यात आल्याचा आरोप माने यांनी केला आहे.

Advertisements

परिचारिका नसल्याने रुग्णाला स्वतःच काढावे लागले सलाईन
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा धक्कादायक प्रकारही माने यांनी उघडकीस आणला. सकाळी वॉशरूमला जाण्यासाठी सलाईन काढणे गरजेचे होते; मात्र वॉर्डामध्ये एकही सिस्टर (परिचारिका) किंवा ब्रदर उपस्थित नव्हता.

अखेर नाइलाजास्तव माने यांना स्वतःच आपल्या हातातील सलाईनची सुई काढावी लागली. शासकीय रुग्णालयातील या बेजबाबदार आणि जीवघेण्या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!