मुरगुड (शशी दरेकर) : तुळजापूर येथे देवदर्शनासाठी आपली क्रुझर चारचाकी वाहन घेऊन गेलेल्या निढोरी ता. कागल येथील चालकाचा तुळजापूर येथील पार्किंग मध्ये थांबले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हा मृत्यू झाला. युवराज उर्फ देवानंद सातापा सावंत (वय ४६ वर्षे )असे मयत क्रुझर चालकाचे नाव आहे.
यमगे येथील प्रवासी भाविकांना घेऊन काल पहाटे युवराज सावंत जादाच्या चालकासह क्रुझर वाहनाने तुळजापूर येथे गेले होते. पंढरपूरातून तुळजापूरमध्ये ते आले असता गाडी पार्क केल्यानंतर त्यांना गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने उपचारार्थ तुळजापूरच्या शासकीय इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज सकाळी मयत युवराज यांचा मृतदेह गावी आणल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. युवराज उर्फ देवानंद सावंत हे निढोरीतील श्री भैरवनाथ विकास सेवा संस्थेचे विद्यमान संचालक होते.
सुदैवाने वाहन चालवत नसताना घटना घडली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही महिन्यापूर्वीच मयत युवराज उर्फ देवानंद यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,बहिण, पुतण्या, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन निढोरी ता. कागल येथे रविवार ८ रोजी स. ८. ३० आहे.