१३ संचालकांचे बहुमत सिद्ध करण्याचे प्रयत्न निष्फळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या नवनिर्वाचित चेअरमन निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची सभा गणपूर्ती (कोरम) अभावी तहकूब करण्यात आली आहे. गोकुळ शिरगाव येथील संघाच्या प्रधान कार्यालयात करवीर विभागाच्या उपविभागीय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी श्रीमती मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आज सकाळी ११ वाजता सुरू झाली.
सदर सभेस नवनिर्वाचित २५ संचालकांपैकी १३ संचालक उपस्थित होते, तर १२ संचालक अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.

नेमकी काय आहे तरतूद?
संस्थेच्या उपविधीतील नियम १४ (५अ) व (१२) नुसार, सभेचे कामकाज कायदेशीररीत्या पार पाडण्यासाठी एकूण संचालकांच्या ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच किमान १४ संचालकांची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. मात्र, निर्धारित वेळेत केवळ १३ च संचालक उपस्थित राहिल्यामुळे विहित संख्याबळ (गणपूर्ती) अभावी अध्यासी अधिकारी श्रीमती मोसमी चौगुले यांनी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चेअरमन निवडीची प्रक्रिया तहकूब करत असल्याचे घोषित केले.
सभा तहकूब झाल्यानंतर, उपस्थित १३ संचालकांनी आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करत चेअरमन निवडीची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशा आशयाचे एक लेखी निवेदन अध्यासी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. परंतु, कायदेशीर तरतुदी आणि नियमांनुसार गणपूर्ती पूर्ण होणे बंधनकारक असल्यामुळे त्यांचे हे निवेदन व मागणी कायदेशीर कारणास्तव अध्यासी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.
या घडामोडींमुळे गोकुळच्या चेअरमन निवडीचा तिढा निर्माण झाला असून, सहकार क्षेत्राचे यापुढील राजकीय हालचालींकडे लक्ष लागून राहिले आहे.