कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान २०२६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १५९ प्रलंबित महसुली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या अभियानाचा ९०० नागरिकांना थेट लाभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रयत्नांतून शनिवारी (१० ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग आणि तालुका स्तरावर या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
महसूल विभागाकडील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने आणि परस्पर सामंजस्याने सोडविणे हा या अभियानाचा उद्देश होता. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रयत्नांतून या लोक अदालतीच्या माध्यमातून ९०० नागरिकांना थेट लाभ मिळाला. लोक अदालतीमुळे पक्षकारांना प्रलंबित प्रकरणांमुळे होणारा मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक खर्च यातून दिलासा मिळाला.

या अभियानात पन्हाळा तालुक्यातील ३०, भुदरगड २२, करवीर १९, कागल १८, राधानगरी १४, आजरा ११, चंदगड १०, गडहिंग्लज १०, हातकणंगले ८, शाहूवाडी ७, अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील ३, शिरोळ ३, गगनबावडा २ आणि अपर तहसीलदार, इचलकरंजी येथील २ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांच्या परस्पर संमतीने आणि तडजोडीतून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली.
पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या या यशाबद्दल जिल्हा महसूल प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रलंबित महसुली वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी शासनाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.