आजअखेर ५,९०६ विद्यार्थ्यांना १ कोटी ८० लाख ६८ हजार रुपयांचे वितरण
कागल (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी विविध क्षेत्रांत यशाची शिखरे गाठावीत, या उद्देशाने शाहू साखर कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी सुरू केलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आजही अखंडपणे सुरू आहे.
या योजनेचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत, ही कारखान्यासाठी अभिमानाची बाब आहे, या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळत असल्याचे पाहून समाधान वाटते, असे प्रतिपादन अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी २९३ विद्यार्थ्यांना एकूण ९ लाख ३७ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
श्रीमती घाटगे पुढे म्हणाल्या, आज शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत असून विद्यार्थ्यांनी बदलती शिक्षणपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. पालकांनीही याबाबत सजग राहावे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च कौशल्य संपादन करून तज्ज्ञ बनण्याचा प्रयत्न करावा.
स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शेतकरी आणि कर्मचारी यांना केंद्रस्थानी ठेवून कारखान्याची धोरणे आखली. त्यांच्या कुटुंबीयांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाही त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग होता. याच दूरदृष्टीतून त्यांनी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केली. आजअखेर या योजनेअंतर्गत ५,९०६ विद्यार्थ्यांना एकूण १ कोटी ८० लाख ६८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे.
यावेळी संचालक संजय नरके, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. फायनान्स मॅनेजर आर. एस. पाटील यांनी स्वागत केले, तर संचालक सचिन मगदूम यांनी आभार मानले.
मुलींच्या गुणवत्तेला ‘शाहू’चे जादा शिष्यवृत्तीतून प्रोत्साहन!
शैक्षणिक गुणवत्तेत मुली आघाडीवर असून त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाहू साखर कारखान्यामार्फत मुलींसाठी तुलनेने अधिक शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा या योजनेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे, ही आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, अशा शुभेच्छा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिल्या.