कागल सीमा तपासणी नाक्यावर अनियमीत दंड व आर्थिक लूट

कागल / प्रतिनिधी : कागल येथील सीमा तपासणी नाक्यावर सुरक्षा रक्षकांकडून वाहनचालकांना अतिरिक्त वजनाची भीती दाखवून आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधित सुरक्षा रक्षकाला तातडीने निलंबित करावे, अन्यथा सीमा तपासणी नाका बंद पाडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील यांनी नाका प्रशासनाला दिला.

Advertisements

      गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास वाहनचालक सतीश इंगळे हे सातारा येथून पक्षी घेऊन गडहिंग्लजकडे जात होते. सीमा तपासणी नाक्यावर वाहन वजनासाठी नेले असता वजन न करता वाहन मागे घेण्यास सांगण्यात आले. वाहनामध्ये अतिरिक्त वजन असल्याचे सांगून २२ हजार रुपये दंड होईल, अशी भीती दाखविण्यात आली. त्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाने दोन हजार रुपये घेत वाहन फ्री लेनमधून सोडल्याचा आरोप इंगळे यांनी केला.

Advertisements

       या घटनेची शहानिशा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाका व्यवस्थापकाची भेट घेतली. यावेळी हर्षल पाटील यांनी, अतिरिक्त वजनाच्या नावाखाली वाहनचालकांकडून पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले. गुरुवारी घडलेल्या घटनेतील संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करून निलंबित करावे, अन्यथा पक्षाच्या वतीने नाका बंद करण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

           शहरप्रमुख अजित मोडेकर यांनीही सीमा तपासणी नाक्यावरील सुरक्षा रक्षकांकडून वाहनचालकांना ओव्हरलोडची भीती दाखवून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला. रात्रीच्या वेळीही हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!