कागलमध्ये १० ऑक्टोबरला महसूल लोकअदालत

कोल्हापूर (जिमाका) : कागल तालुक्यातील पहिली त्रैमासिक महसूल लोकअदालत शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांनी या लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले अर्धन्यायिक महसुली दावे तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढावेत आणि महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान २०२६ चा लाभ घ्यावा, असे आवाहन कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे.

Advertisements

विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकअदालतीच्या धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या संमतीने व तडजोडीने महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान २०२६ हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

Advertisements

या अभियानांतर्गत पहिली त्रैमासिक महसूल लोकअदालत १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कागल तालुक्यात तहसीलदार यांच्याकडील अर्धन्यायिक दावे तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक दाव्यांसाठी ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत संबंधित पक्षकारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांच्या अधिकृत ई-मेलवर अर्ज सादर करता येणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी दि. १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. पात्र अर्जांच्या बाबतीत संबंधित पक्षकारांनी कायदेशीर तडजोडनामा (प्रपत्र-अ) दि. २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सादर करावा, असे तहसील कार्यालय कागलमार्फत कळविण्यात आले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!