कागल : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच, पुष्पहार अर्पण करून महाराजांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरपरिषद आवारातील पुतळ्यासही पूजन करून मानवंदना देण्यात आली. या सोहळ्याला कागलचे नगराध्यक्ष सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, अखिलेश घाटगे, चंद्रकांत गवळी, रमेश माळी, प्रवीण काळवर, अमित पिष्टे, बाळासो माळी, अमर सणगर, अरुण गुरव, संजय चितारी, नवल बोते, असलम मुजावर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, पालिका अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.