मुरगूड (शशी दरेकर) : वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे शैक्षणिक, सामाजिक,पर्यावरणीय कार्य प्रेरणादायी असून समाजासमोर ते एक आदर्श आहेत असे प्रतिपादन मा.प्राचार्य डाॅ. अर्जुन कुंभार यांनी केले. ते येथील शिवराय विद्यालय ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या सेवापूर्ती समारंभ प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक होते. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सुहासिनीदेवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ मा.ग. गुरव, जिल्हा सहकार बोर्ड ज्येष्ठ संचालक बी आर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

डाॅ कुंभार म्हणाले, शिक्षक हा शाळेपुरता मर्यादित न राहता तो समाजाशी बांधील असला पाहिजे. शाळेत विद्यार्थ्यांना आणि शाळेबाहेर समाजाला मार्गदर्शन करणारा शिक्षक हा खरा समाज शिक्षक असतो आपल्या चतुरस्त्र भूमिकेतून विद्यार्थी, शाळा, सहकारी, समाजातील उपेक्षित लोक, कष्टकरी या साऱ्यांशी आपल्या मनाने बांधले गेलेले आणि आपल्या कार्यातून प्रकट झालेले वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी हे त्यापैकी एक होत.
पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक म्हणाले,
वृक्षमित्र म्हणून सर्वपरिचित असणारे शिवराजचे उपमुख्याध्यापक प्रविण सुर्यवंशी हे खरे समाजशिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जना सोबत पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
ॲड. मंडलिक म्हणाले, ” वृक्षमित्र सुर्यवंशी यांनी गेली ३० वर्षे बियांचे संकलन करून त्यापासून लाखो रोपांची निर्मिती करत ती मोफत वाटण्याचे अद्भुत काम केले आहे. त्यामुळे परिसरात त्यांनी निर्माण केलेल्या हजारो वृक्षांचे जतन झाले आहे. शिक्षकी पेशा सोबत पर्यावरण संवर्धन व सामाजिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
याप्रसंगी श्री बी आर देसाई व सौ नीता सुर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास मुरगूड मुरगुड नगरपरिषद गट नेते सुहास खराडे, नगरसेवक एस व्ही चौगले, सुनील रणवरे, दत्ता मंडलिक, वृद्धाश्रम चालक समाजसेविका विमलताई सुतार, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, शिवाजीराव चौगले , व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर नगरसेविका गीता आंगज, सुरेखा लोकरे,श्रीमती संगीता चौगले, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य डाॅ.शिवाजी होडगे, प्राचार्य व्ही बी खंदारे, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, मंडलिक साखर कारखाना संचालक मारुतीराव काळुगडे,एम टी सामंत , सर्वश्री गुरुवर्य पी व्ही पाटील, वाय आर जाधव, पी ए चौगले, बी एच गुजर, बी जी साखळकर, एच जी कांबळे आदींसह, शिक्षक बंधूभगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत संदीप मुसळे यांनी, प्रास्ताविक अविनाश चौगले यांनी,सुत्रसंचालन प्रा.रविंद्र शिंदे यांनी तर आभार पी.डी. रणदिवे यांनी मानले.
वाढदिवस वृक्षमित्राचा पण सत्कार गुरुवर्यांचा आणि आई-वडिलांचा
वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचा वाढदिवस पण या कार्यक्रमात सत्कार मात्र जन्मदात्या माता-पित्यांचा आणि मार्गदर्शक गुरुजनांचा असा समारंभ आयोजित केला होता. तर शुभेच्छा स्विकारण्यासाठी श्री सुर्यवंशी यांनी हार,बुके ऐवजी वृद्धाश्रमासाठी धान्य संकलन केले. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थितांनी खूप कौतुक करत त्या सामाजिक उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला.