ऐतिहासिक विजयाबद्दल पेढे वाटत फोडले फटाके
कागल / प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी (पुडुचेरी) व आसाम या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांसह सत्ता स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर सुळकूड (ता. कागल) येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पेढे वाटप करण्यात आले तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी परिसरात “भाजप विजयाच्या घोषणा” देत कार्यकर्त्यांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या जल्लोषात बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, पंचायत समिती सदस्या तेजस्विनी भोरे, राजे बँकेचे संचालक अमोल शिवई, रणदिवेवाडीचे सरपंच राहुल खोत, बापूसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वास जाधव, सागर बाळाण्णा, सुहास लगारे, चंद्रकांत धामाण्णा, आणसो चौगले, किरण पाटील, भगवान माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे यांनी या विजयाला “ऐतिहासिक” संबोधले. त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपने सत्ता स्थापन करत ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केला, तर आसाममध्ये दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. तसेच केरळ व तामिळनाडूमध्येही पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन प्रचारात सक्रिय सहभागी झालेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्व नेते, कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच या राज्यांतील जनतेचे आभार मानत भाजपची विजयी वाटचाल भविष्यातही अशीच कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.