कागलच्या कापशी खोऱ्यात वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या दुर्लक्षाविरोधात ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा
व्हन्नाळी: कागल तालुक्यातील हसूर बुद्रुक, बोळावी, ठाणेवाडी आणि साके यांसह कापशी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये रानगवे, बिबट्या आणि तरसांनी उच्छाद मांडला आहे. वन्यप्राण्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून,
वनविभागाच्या सुस्त कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या उपवनसंरक्षकांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, जंगलात लागणाऱ्या वणव्यांमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे. “वनविभागाने वेळेत खबरदारीचे उपाय योजले नाहीत, त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे.
जर तातडीने बंदोबस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संभाजीराव भोकरे यांनी दिला आहे. यावेळी अशोक पाटील-बेलवळेकर, नितीन डावरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.