दौलतवाडीत गुरुवर्य ग. बा. सावंत मेमोरियल ट्रस्टचे उद्घाटन व पुतळा अनावरण
मुरगूड (शशी दरेकर) : माणसांनी आयुष्यात प्रेम मिळवावे तेच आयुष्यभर पुरते. व्यवसाय असो वा नोकरी आपण कुठेही असलात तरी जन्मभूमीच्या मातीशी असलेली नाळ तुटता कामा नये. व्यवसाय, नोकरी अथवा सामाजिक कार्य असो त्यात वेडाने झपाटलेल्या व्यक्तीचं जीवनात यशस्वी होतात. असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर कै. फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्था गिरगावचे अध्यक्ष प्रताप (बापू) कोंडेकर यांनी केले.
दौलतवाडी (ता-कागल) येथील गुरुवर्य कै.ग.बा.सावंत मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे उदघाटन, ट्रस्टच्या मळगी व स्टोअर रूमचे लोकार्पण व गुरुवर्य कै.ग.बा.सावंत यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार पी.जी. पाटील गुरुजींना प्रदान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे उद्घाटन लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे संचालक पुंडलिक डाफळे यांच्या हस्ते गुरुवर्य ग. बा. सावंत यांच्या पुतळ्याचा अनावरण राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक पी.जी.पाटील (मांगोली, ता. राधानगरी) यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी मुख्याध्यापक शिवाजीराव सावंत, नेताजीराव सावंत, गोकूळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील, मुरगूडच्या उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, कोजिमारी पतसंस्थेचे शिक्षक नेते दादा लाड, मनीषा सावंत, चारू पाटणे, सौरभ कल्याणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष व एससीजी डिझाइन सोल्युशन्स बहुराष्ट्रीय कंपनीचे संचालक संग्रामसिंह सावंत म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवन आमुलाग्र बदलण्याचे कार्य ग बा सावंत यांनी हयातभर केले. तोच कार्याचा वैचारिक वारसा निरंतर ठेवण्यासाठीच या ट्रस्टची उभारणी केली आहे.
या कार्यक्रमास सुशील बरगे, कर्नल वेसवेकर, उत्तम कांबळे, विक्रम नलवडे, सरपंच शितल जाधव, नगरसेविका गीतांजली आंगज, सविता गोधडे, माजी सरपंच सर्जेराव कानडे, नगरसेवक सुनील रणवरे, राहुल शिंदे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, आजी माजी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक संग्रामसिंह सावंत यांनी केले. टोमॅटो एफएमचे जॉकी विश्वराज जोशी यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार शिवाजी सावंत ( गारगोटी ) यांनी मानले.