गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमध्ये मंगळवारी दुपारी पैशांच्या व्यवहारातून एका सिमेंट व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघे आरोपी सिद्धार्थ वैद्य आणि कुणाल जाधव सध्या फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कणेरीवाडी येथील वीरेंद्र कृष्णा पाटील (वय ३५) हे मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मित्र राहुल कांबळे यांच्यासह गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील गोकुळ चौक येथील दूर्वा हॉटेलमध्ये जेवण करत बसले होते.

त्याच वेळी संशयित आरोपी प्रवीण चव्हाण, राहुल माती वडर, रोहित वैद्य, सौरभ रमेश वैद्य, सिद्धार्थ वैद्य आणि कुणाल जाधव (सर्व राहणार निपाणी) हॉटेलमध्ये आले. त्यांनी वीरेंद्र पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांना जबरदस्तीने हॉटेलबाहेर घेऊन गेले.
हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून वीरेंद्र पाटील यांना तमनाकवाडा (कागल) येथील डोंगराळ भागात नेण्यात आले. तेथे एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपी सौरभ वैद्य याने लोखंडी पाईपने पाटील यांच्या डाव्या पायावर मारहाण करून त्यांना जखमी केले.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, आरोपी रोहित वैद्य याने खिशातील बंदूक काढून त्यामध्ये गोळ्या भरल्या आणि ती वीरेंद्र पाटील यांच्या कपाळाला लावत “तू आता पैसे दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. पैशाच्या व्यवहारातून हे कृत्य करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे व्यावसायिक क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव चा सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जे. मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.