कागल (विक्रांत कोरे) : शारदीय नवरात्री उत्सवनिमित्त येथील ऐतिहासिक श्री राम मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री राम मंदिर देवस्थान जिर्णोध्दार समितीच्यावतीने या सर्व कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.आज सोमवारी (ता.२३) सकाळी मंत्रोघोषात अभिषेक व विधीवत घटस्थापना करुन या उत्सवास प्रारंभ झाला.
कागल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाहू ग्रुपचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांची सातत्याने रेलचेल असते.शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने श्री राम मंदिरमध्ये श्री अंबाबाई देवीची विविध रुपांमध्ये दरवर्षी प्रमाणे पुजा बांधली जाणार आहे.त्यामुळे भाविकांना दक्षिण काशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दररोज विविध रुपात कागलमध्ये दर्शन होणार आहे.दररोज सकाळी नित्य पुजापाठ व सायंकाळी सात वाजता महाआरती होईल.

शनिवारी (ता.२७)सायंकाळी सव्वासात वाजता गरबा होईल. रविवारी(ता.२८) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान कुंकूमार्चन सोहळा तर सायंकाळी पाच ते सात यादरम्यान कुमारिका पूजन कार्यक्रम होईल.कुंकूमार्चन सोहळ्यासाठी महिलांनी नावे नोंदविण्याची आहेत. सोमवारी(ता,२९)सायंकाळी सव्वासात वाजता कागल संगीत अकॅडमीचा भाव व भक्ती गीतांचा सदाबहार कार्यक्रम होईल.
मंगळवारपासून अनुक्रमे मयूरासन, मत्स्यासन, नागासन, चंद्रासन, तुळजाभवानी, सरस्वती, महिषासुरमर्दिनी, गजासन, रथ पूजा अशा विविध रूपात पूजा मांडण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.