कोल्हापूर : माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाला सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे, यावर कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार कार्यशाळेत एकमत झाले. “बदल स्वीकारून माध्यमांचे महत्त्व वृद्धिंगत करूया,” असा सकारात्मक सूर या कार्यशाळेत उमटला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातर्फे आयोजित या पहिल्या टप्प्यातील कार्यशाळेत शासनमान्य दैनिके व साप्ताहिकांचे संपादक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांसाठीच्या अधिस्वीकृतीपत्रिका, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजना, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आरोग्य विषयक सवलती, तसेच जाहिरात धोरणांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार विजय जाधव यांनी समितीच्या कामकाजाची माहिती देत पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुराव्याचे महत्त्व अधोरेखित केले. असोसिएशन ऑफ स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सम्राट सणगर यांनी लहान व मध्यम वृत्तपत्रांना येणाऱ्या जाहिरात वितरणाच्या आणि दरांच्या अडचणी मांडल्या.

माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी पत्रकारांच्या योजनांच्या सक्षम अंमलबजावणीची ग्वाही दिली, तर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी कार्यालयाच्या वृत्तप्रसिद्धीबाबत माहिती दिली. कार्यशाळेच्या सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले, तर आभार रणजित पवार यांनी मानले. दिवंगत संजय देशमुख यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.