मुख्याध्यापक कार्यशाळेतून शिक्षकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
कोल्हापूर: भावी पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने, करवीर तालुक्यातील शाळांना तंबाखूमुक्त करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने जिल्हा परिषद आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात एक विशेष कार्यशाळा संपन्न झाली. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP), जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर यांनी “भावी पिढी व्यसनमुक्त राहणे ही काळाची गरज आहे,” असे स्पष्ट करत तंबाखूमुक्ततेचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी कोटपा कायदा २००३, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, तसेच २०० रुपयांपर्यंतच्या दंडात्मक कारवाईसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम यांनी उपस्थित शिक्षकांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली, तर एकनाथ कुंभार व संजय ठाणगे यांनी सादरीकरणाद्वारे तंबाखूमुक्त शाळांसाठी आवश्यक निकषांची माहिती दिली. या कार्यशाळेला करवीर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.