कोल्हापुर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खऱ्या अर्थाने प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळांना देऊन मूलभूत घटकांची पायाभरणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिल्याशिवाय विकास शक्य नाही आणि आज अशा उपक्रमांद्वारे तेच कार्य त्यांच्यामार्फत होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास होत असतो, मात्र दुर्दैवाने आज भारतामध्ये फक्त तीन टक्केच पैसा शिक्षणावरती खर्च होतो. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
आम. जयंत तासगावकर यांच्या वतीने ८१९ शाळांना TV संच
ते आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील ८१९ माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

खासदार शाहू महाराज, मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्मार्ट टीव्ही वितरणाचा हा कार्यक्रम कोल्हापुरातील सायबर कॉलेजमधील आनंद भवन हॉलमध्ये संपन्न झाला.
अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज म्हणाले, छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाचा पाया घातला. तीच परंपरा आमदार जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे, हे कोल्हापूरसाठी भूषणकारक आहे. आमदार सतेज पाटील यांनीही आमदार जयंत आसगावकर यांच्या कार्याची प्रशंसा करत म्हणाले, आजपर्यंत १०० टक्के निधी शैक्षणिक कार्यासाठी वापरणारा राज्यातील पहिला शिक्षक आमदार म्हणून आसगावकर सरांचा उल्लेख करता येईल.
शिक्षकांच्या समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडून शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक शिक्षकांनी करून स्वतःला अपडेट करावे. नवीन तंत्रज्ञानानुसार जगभरातील ६९ टक्के नोकऱ्या टिकणार आहेत, मात्र जे लोक स्वतःला आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करतील तेच या नोकरीसाठी पात्र होतील.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी, हा माझा संकल्प आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणपद्धतीशी जोडले गेले पाहिजे. याच दृष्टीने माझ्या आमदार निधीतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शिक्षक आमदार या नात्याने जुन्या पेन्शन, अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांविरोधातील पाठपुरावा, अकरावी प्रवेशातील विलंब, वेतनश्रेणी संबंधित अन्याय आणि पवित्र पोर्टलच्या त्रुटी यावर देखील ठाम भूमिका घेऊन सर्व प्रश्नांबाबत मी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला असून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तसेच प्रत्येक अडीअडचणीवर मात करण्यासाठी विधान परिषदे बरोबरच रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निशांत गोंधळी यांनी केले.
या कार्यक्रमाला कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे राहुल पवार, उपाध्यक्ष मिलिंद पांगरेकर. सचिव आर. वाय. पाटील, कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, दादा लाड, बोराडे सर, बाबासाहेब पाटील, के. के. पाटील, उदय पाटील, सुरेश संकपाळ यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.