तेहरानकडून अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ला झाल्याचा दावा, युद्धाची शक्यता वाढली
दिल्ली : अमेरिकेने इराण (iran) मधील तीन अण्वस्त्र प्रकल्पांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने युद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, जागतिक शांततेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील फोर्डो (Fordo), नतान्झ (Natanz) आणि इस्फहान (Isfahan) येथील अण्वस्त्र प्रकल्पांना लक्ष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर या हल्ल्याची माहिती दिली आणि हा हल्ला यशस्वी झाल्याचा दावा केला. सर्व अमेरिकन विमाने इराणच्या हवाई हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या सरकारी वाहिनीवरून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सुरुवात तुम्ही केली आहे, पण शेवट आम्ही करू. प्रत्येक अमेरिकन जवान आमचं लक्ष्य असेल.” इराणने हे हल्ले झाल्याचे मान्य केले असले, तरी त्यांच्या अण्वस्त्र प्रकल्पांना मोठे नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे. इराणने म्हटले आहे की, त्यांच्यावर कितीही हल्ले झाले तरी त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहील.
या हल्ल्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेची थेट एंट्री झाली आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यांच्या नियोजनात ते पूर्ण समन्वयामध्ये होते.
या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. रशिया आणि चीनने इराणला नेहमीच पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता हे देश काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तेल आणि वायूच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही या संघर्षाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.