गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत मान्सूनपूर्व नालेसफाई आणि व्यापक वृक्षारोपण मोहिमेला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत सध्या मान्सूनपूर्व तयारी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दुहेरी मोहिमेने सज्ज झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पुढाकाराने सुरू असलेल्या नालेसफाई मोहिमेला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदा व्यापक वृक्षारोपण कार्यक्रमावर विशेष भर दिला जात आहे.

Advertisements

गेल्या पाच दिवसांपासून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत युद्धपातळीवर नालेसफाई मोहीम राबवली जात आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांलगत असलेले मोठे आणि लहान नाले जेसीबी आणि मजुरांच्या साहाय्याने स्वच्छ केले जात आहेत. प्लास्टिक, कचरा आणि गाळ काढून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची तयारी पूर्ण केली जात आहे.

Advertisements

उद्योजकांनाही आपापल्या परिसरातील नाले स्वच्छ ठेवण्याचे आवाहन MIDC कडून करण्यात आले आहे, आणि त्याला उद्योजक सकारात्मक प्रतिसाद देत सक्रिय सहभाग घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर, औद्योगिक वसाहतीत मोठी वृक्षारोपण मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आय.ए. नाईक आणि उपअभियंता अजयकुमार रानगे हे विविध औद्योगिक आस्थापनांना भेटी देऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे आवाहन करत आहेत.

Advertisements

या आवाहनाला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अनेक उद्योजक आपल्या सीएसआर निधीतून (CSR Fund) वृक्षारोपणासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे येत्या काळात औद्योगिक परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक बनण्याची दाट शक्यता आहे.

उपअभियंता अजयकुमार रानगे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील मान्सूनपूर्व साफसफाई युद्धपातळीवर सुरू असून, यावर्षी व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी होऊन औद्योगिक परिसर ऑक्सिजनयुक्त करण्यासाठी सहकार्य करावे.”

स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीचा हा प्रयत्न इतर औद्योगिक वसाहतींसाठी एक आदर्श ठरू शकतो, ज्यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्वच्छतेची आणि हरित क्रांतीची लाट येऊ शकेल.

Leave a Comment

 
error: Content is protected !!