
कोल्हापूर (जिमाका) : शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील भूमिपुत्र, कै. सुनिल गुजर (११० इंजिनियर रेजिमेंट, अरुणाचल प्रदेश) हे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना दिनांक १३ मार्च रोजी शहीद झाले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवरील काम सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांनी प्राण गमावले.
सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात झालेल्या या अंत्यविधीसाठी कुटुंबीय, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कै. सुनिल गुजर यांच्या सेवा आणि त्यागाला संपूर्ण गावाने अभिमानपूर्वक सलाम केला. त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून, कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण जिल्हा सहभागी झाला आहे.
देशासाठी सेवा देणाऱ्या या वीरपुत्राच्या स्मृतींना कोल्हापूरकर कायम अभिवादन करतील. जवान सुनिल विठ्ठल गुजर (२५) अरूणाचल प्रदेशात चीन सीमेलगत रस्ता बनविण्याचे काम करत असताना, दि. १३ मार्च रोजी त्यांचे वाहन खोल दरीत कोसळले होते. या अपघातात त्यांना वीरमरण आले. या बातमीने संपुर्ण शाहुवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. काल सायंकाळी पुण्यातुन आज सकाळी कोल्हापूरात त्यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर लष्करी वाहनातून, त्यांच्या मुळ गावी दाखल झाले.
यावेळी बांबवडे बाजारपेठेसह परिसरातील गावांत बंद ठेऊन आदरांजली वाहली. जवान गुजर यांच्या अत्यंदर्शनासाठी बांबवडे पासुन त्यांच्या गावापर्यंत दोन्ही बाजुनी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस प्रशासन,सैन्य दलाच्या वतीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. वडिल विठ्ठल यांनी भडाग्नी दिला. यावेळी वीर जवान सुनील गुजर अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनेही श्रद्धांजली वाहण्यात आली.