कागल / प्रतिनिधी – कागल येथील डी.आर. माने महाविद्यालयांमध्ये भूगोल विभागाच्यावतीने ‘जागतिकीकरण समकालीन समस्या आणि आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के हे उपस्थित होते. त्यांनी उद् घाटनपर भाषणात जागतिक स्तरावर असणाऱ्या समस्या आणि त्या निवारणासाठी वेगवेगळ्या स्तरावर सुरू असणारे उपक्रम सांगितले.
या ज्वलंत विषयावर डी. आर. माने महाविद्यालयाने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारातील प्लास्टिक वजा केले तर प्लास्टिक समस्येपासून आपण निश्चितच सुटका मिळू शकतो. जागतिकीकरणाचा जसा निसर्गावर प्रभाव पडलेला आहे तसा प्रभाव सर्व क्षेत्रावर पडलेला जाणवतो. तसेच त्यांनी महाविद्यालय परिसर, एनसीसी कॅडेट आणि महाविद्यालय व्यवस्थापनाचे कौतुक केले.
परिषदेसाठी एकूण 290 प्राध्यापक संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 155 सहभागी संशोधकांनी पेपर वाचन केले. परिषदेसाठी कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा या राज्यातील अनेक प्रसिद्ध विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापकांनी पेपर वाचन केले. सदर राष्ट्रीय परिषदेमध्ये जगाला भेडसावणाऱ्या अनेक विक्राळ समस्या आणि त्यांच्या निवारणासाठी वैयक्तिक, कौटुंबिक, ग्राम, राज्य, देश व जागतिक पातळीवर कशाप्रकारे तोंड देता येईल याचे मौलिक मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांनी केले. त्यांनी संस्थेचा मागोवा घेतला तसेच परिषद आयोजनामागील भूमिका सांगितली. तर संस्थेचे संचालक मा.बिपिन माने यांनी या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून निश्चितच एक आशावादी चित्र निर्माण होईल असे मत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रीय परिषद समन्वयक प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, शिवाजी विद्यापीठ कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम हे उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे आभार प्रा. राजेंद्र मोंगणे यांनी मानले. तर सर्व कार्यक्रमाचे आभार समन्वयक डॉ. आदिनाथ गाडे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. रोहित नाईक आणि पल्लवी कुंभार यांनी केले. यावेळी संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.