मुरगूड ( शशी दरेकर ) – आईवडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. जो सेवा करतो त्यालाच पुण्य मिळते . आजच्या जगात ज्येष्ठांचा आदर मान राखण्याची आवश्यकता आहे त्यांच्या जीवनात सुखाचे व आनंदाचे क्षण निर्माण करून देणे हे सामाजिक काम व कर्तव्य आहे असे प्रतिपादन मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी श्री गंगापूरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक किरण गवाणकर होते तर पत्रकार प्रा सुनिल डेळेकर व वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यांनी केले. यावेळी ज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धांचे बक्षिस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेबद्दल प्रा सुनिल डेळेकर यांचा पी. डी. मगदूम यांच्या हस्ते व वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या झाडमाया काव्यसंग्रहास पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गजाननराव गंगापूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना किरण गवाणकर म्हणाले ‘ आज कौटुंबिक वातावरण न राहता प्रत्येक जण आपल्याच विश्वात राहतो त्यामुळे वडिलधाऱ्यांची उपेक्षा होते ती होवू नये. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यासाठी कृतज्ञता जपणे आवश्यक आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. जयवंत हावळ यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक पाटील योनी आभार मानले.