कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील २३ पैकी २२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर (एफ. आर.पी.) जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६ सहकारी व ७ खासगी असे एकूण २३ साखर कारखाने असून, सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत. या अनुषंगाने पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये दि.१५ नोव्हेंबर २०२४ पासून राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरु करण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यानुषंगाने, गाळप हंगाम २०२४-२५ करिता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व २३ सहकार/खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले असून, गाळप हंगाम २०२४-२५ चे ऊस गाळप सुरु केले आहे.
ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार कारखान्यांनी हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाचे १४ दिवसात देय एफआरपी प्रमाणे ऊस किंमत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करणे प्रत्येक कारखान्यावर ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ मधील कलम ३ (३) च्या तरतूदीनुसार बंधनकारक आहे.
१४ दिवसाच्या कालावधीत एफआरपी देयके अदा न केल्यास कलम ३(३A) अ नुसार विलंब कालावधी करीता १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज आकारण्याची तरतूद आहे. तसेच केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या एफ.आर.पी. दरापेक्षा जास्त दर द्यावयाचा असल्यास कारखान्यांनी तो निश्चित करुन हंगाम सुरु करण्यापूर्वी त्या दराची माहिती वर्तमानपत्र व कारखाना स्थळावर प्रसिध्द करणे बंधनकारक आहे.