गोकुळ शिरगाव (सलीम शेख): सरनोबतवाडी ता.करवीर येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील जूना पूल पाडून त्या जागी नवीन दुहेरी भूमिगत पूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या नव्या पुलामुळे अवजड वाहनांची वाहतूक सुलभ होणार असून, सरनोबतवाडीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या पुलाची रुंदी वाढवून अवजड वाहनांना अडचणीशिवाय प्रवास करता येणार आहे. नवीन पूल दोन गाळ्यांचा असल्याने वाहतूक कोंडी कमी होणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला साडेसात मीटर रुंदीचे सर्व्हिस रस्ते उभारले जाणार आहेत.
पुलाचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहनधारकांनी उचगाव किंवा उजळाईवाडी पुलाकडून वळावे. या पुलाच्या बांधकामामुळे सरनोबतवाडीसह परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.
नागरिकांची प्रतिक्रिया सरनोबतवाडीचा विस्तार होत असल्याने जुना पूल अवजड वाहनांसाठी अपुरा पडत होता. नव्या पुलामुळे नागरिकांची वर्षांची अपेक्षा पूर्ण होणार असल्याने ते उत्साही आहेत.
कामकाजासंबंधी माहिती
केंद्र सरकारची योजनेतून हे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत रोड वे सोल्यूशन या कंपनीद्वारे राबविले जात आहे. परिसरातील इतर ठिकाणी कामे सरनोबतवाडीसह परिसरातील उचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, लक्ष्मी टेकडी येथेही उड्डाणपूल आणि भूमिगत पूल उभारण्याचे काम सुरू आहे.