कोल्हापूर (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल येथे महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि. या शासन नियुक्त सेवापुरवठादाराकडून संपूर्णपणे आधुनिक व संगणकीकृत सीमा तपासणी नाका उभारण्याची कार्यवाही पुर्ण झाली असून मंगळवार 10 डिसेंबर 2024 पासून कागल येथे सध्या कार्यरत असलेल्या तपासणी नाक्याऐवजी नव्याने स्थापित झालेला व संपूर्ण आधुनिकीकरण, संगणकीकरण झालेला सीमा तपासणी नाका कार्यान्वीत करुन सर्व कामकाज सुरु करण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.
शासन निर्णय दि.25 मार्च 2008, दि.25 जून 2008 व दि.09 ऑगस्ट 2012 अन्वये राज्यातील परिवहन विभागाच्या 22 सीमा तपासणी नाक्यांचे बांधा, वापरा व हस्तांतरण या तत्वावर आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला होता. तसेच दि. 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयाव्दारे राज्यात महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 223 (6) (अ) अंतर्गत प्रदान शक्तीचा वापर करुन आधुनिक सीमा तपासणी नाक्यांवर वाहन मालकाकडून, वाहन चालकाकडून विहीत केलेल्या तरतूदीनुसार सेवा कर व उपकर वसूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही श्री. भोर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.