निवेदनानंतर तातडीची कार्यवाही करू – सरपंचाचे आश्वासन
मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापुर येथील बाळु मामांच्या पांढरीत अगदी उड्डाण पुलानाजिक पूर्वेच्या बाजूला असलेल्या ओढ्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
खरकट्या पत्रावळ्या,प्लास्टिक च्या पिशव्या, कागदांचे ढीग,औषधांच्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, आइस्क्रीम व खाद्य पदार्थांचे कप ,कुजलेले इतर पदार्थ आणि या सर्वांना बरोबर घेऊन संथपणे वाहणारा ओढा यामुळे अक्षरशः नरक सदृश अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली आहे.
घाण पाण्याचा निचरा अदमापुरच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पाझरत रहातो .त्यामुळे गावात रोग राई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बाळूमामा मंदिरात रोज हजारो भाविक लांबवरून दर्शनासाठी येत असतात.भाविकांनी फेकलेल्या वस्तूंमुळे जो कचरा होतो त्याचे निर्मूलन नीट होत नाही .हा कचरा शेजारच्या ओढ्यात साठून रहातो . तेथील दूषित पाणी पुढे नदीला जाऊन मिळते.त्यामुळे नदीकाठच्या गावांत सुध्दा रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र, कनार्टक, तेलंगणा येथून लाखो भाविक बाळूमामा मंदिरात येत असल्याने हा धोका उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायत यांनी याची जबाबदारी स्वीकारून या कचऱ्याचे योग्य निर्मूलन करावे व नागरिकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका टाळावा असे निवेदन बाळूमामा भक्त व शिवभक्त,सामाजिक संस्था व कार्यकर्ते,व त्रस्त नागरिकांच्या वतीने देण्यात आले.
यावर योग्य ती कार्यवाही स्थानिक प्रशासना कडून न झाल्यास जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटेल. प्रसंगी रास्ता रोको सारख्या उग्र आंदोलनाचाही मार्ग अवलंबावा लागेल. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, बाळूमामा भक्त , शिवभक्त यांच्यासह नागरीक उपस्थित होते.