कोल्हापूर दि. 04 ( प्रतिनिधी) : हौशी चित्रकार श्री बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर यांनी वयोमानाला न जुमानता देवदेवता व महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या चित्रकलेतून जिवंत केल्या आहेत. त्यांची ही चित्रे म्हणजे भक्तिभाव व कलेचा संगम असून 85 व्या वर्षी त्यांनी केलेले हे कार्य प्रेरणादायी आहे . ” तपस्या ” या चित्रपटदर्शनाच्या माध्यमातून सुंदर चित्रे तर पहावयास मिळतीलच त्यातून संतांची शिकवणही लोकांच्या पर्यंत पोहचेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांनी व्यक्त केला.
येथील हौशी चित्रकार बाळकृष्ण सनगर यांनी साकारलेल्या तैलचित्रांचे प्रदर्शन येथील राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले असून बुधवार पर्यंत चालणाऱ्या या चित्रप्रदर्शनचे उद्घाटन आज सोमवारी जेष्ठ चित्रकार विलास बकरे यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा ते बोलत होते. यावेळी प्राचार्य अजय दळवी विजय टिपुगडे,, प्रसादकुमार सुतार प्रमुख उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक डॉ. मुकुंद सादिगले यांनी केले. ते म्हणाले की वयाच्या 85 व्या वर्षी देखील तरुणाईच्या जिद्दीने बाळकृष्ण सणगर यांनी विविध प्रकारची चित्रे रेखाटली आहेत. ही चित्रे लोकांच्या समोर यावीत म्हणून आम्ही कुटुंबीयांनी या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना अजय दळवी म्हणाले की चित्रकलेची अभिरुची ज्यांच्यामध्ये होती त्या माणसांनीच जगात अनेक चमत्कारी अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत. ही कलेची साधना ईश्वर साधने सारखे असून असेच कार्य बाळकृष्ण सणगर यांनी केले आहे.
यावेळी बाळकृष्ण सणगर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की बांधकाम अभियंता म्हणूनच माझे बहुतांश आयुष्य गेले. चित्रकलेचा अभ्यास केला नाही मात्र त्यामध्ये अभिरुची होती. माझे वडील ज्ञानदेव सणगर (कागल) यांच्याकडून हा वारसा मिळाला याबद्दल मी भाग्यवान समजतो. माझी पत्नी रत्नमाला हिची साथ ही खूप मोलाची ठरली आहे. माझ्या कुटुंबीयांनी माझ्या या कलेला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहीन.
यावेळी प्राचार्य कांचनमाला सणगर श्रीयुत पाडळकर यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास विजय सणगर, डॉ. शर्मिली सादिगले, संगीता गोंजारे, अचला दत्तात्रय परमाळे, कुंदन सणगर, अथर्व सणगर, किशोर सणगर, कुणाल सणगर, यांचेसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नवीनचंद्र सणगर यांनी तर आभार संदीप सणगर यांनी मानले.
85 वर्षाचा शिष्य
बाळकृष्ण सणगर यांचे वय सध्या 85 असून त्यांनी 35 वर्षीय चित्रकार प्रसादकुमार सुतार यांना आपले गुरु मानले आहे. ते गुरुपौर्णिमेला न चुकता घरी जावुन सुतार यांचे दर्शन घेतात. असे जेव्हा कांचनमला सणगर यांनी सांगितले तेव्हा या विनम्र स्वभावाबद्दल जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच प्रसादकुमार सुतार यांनी देखील 85 या वर्षी त्यांची शिकण्याची जिद्द बघून आपण भारावून गेल्याचे सांगितले.
शाहू स्मारक भवन येथे चित्रकार बाळकृष्ण सणगर यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी सणगर यांचा सत्कार विलास बकरे, अजय दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. विजय टिपुगडे, डाॅ. मुकुंद सादिगले आदी मान्यवर उपस्थित होते.