
गोकुळ शिरगाव:(सलीम शेख) : कणेरी येथे एका व्यक्तीने आपल्याच मोठ्या भावाची फसवणूक करून आर्मीची नोकरी मिळविली अशी धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित भावाने पोलिसात फिर्याद दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. आरोपी हा एसएससी परीक्षा अपयशी ठरल्याने आर्मीत भरती होण्यासाठी आपल्याच भावाच्या एसएससी पास झालेल्या सर्टिफिकेटचा गैरवापर करून खोटी कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे त्याने आर्मीत नोकरी मिळवली. त्यानंतरही त्याने आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे पीडित भावाच्या नावाने बनवून त्याची फसवणूक केली.
आरोपीने आर्मीतून निवृत्त झाल्यानंतरही हा प्रकार सुरूच ठेवला. त्याने पीडित भावाच्या नावावर बंदूक परवाना काढला आणि वडीलोपार्जित शेतीची मालकीही आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतली. या सर्व प्रकारामुळे पीडित भावाची फसवणूक झाली.
पीडित भावाने या प्रकरणी कोल्हापूरच्या न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.