मुरगूड (शशी दरेकर) : येथील एलआयसीच्या शाखेत एलआयसीचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सात सप्टेबर पर्यंत विमा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेबरोबरच मुरगूड शाखेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती वरिष्ठ शाखाधिकारी विवेक जोशी यांनी दिली.
मुरगूड शाखेत झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात एलआयसीच्या निगम गीताने व दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाखेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विकास अधिकारी व विमा प्रतिनिधींचा सत्कार वरिष्ठ शाखाधिकारी विवेक जोशी व उप शाखाधिकारी सुरज राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
वरिष्ठ शाखाधिकारी विवेक जोशी यांनी यावर्षीची एलआयसीची डिजिटल इनोव्हेशन, स्वीकार्यता, प्रतिबद्धता, कुशलता ही संकल्पना असून एलआयसीची डिजिटललायजेशनकडे वाटचाल चालू असल्याचे सांगितले.
एलआयसीच्या कामगिरीचा व प्रगतीचा आढावा घेतला . यावेळी विकास अधिकाऱ्यांच्या वतीने प्रवीण निमजे यांनी एलआयसीच्या स्थापनेची माहीती सांगितली. तर मिलिंद चिंदगे यांनी ६८ वर्षात एलआयसी गावा गावात, घराघरात पोचली असून लोकांच्या विश्वासास पात्र ठरली असल्याचे सांगितले.
कार्यक्रम शाखेतील सर्व कर्मचारी , विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी , पॉलिसीधारक यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात उप शाखाधिकारी सुरज राणे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कीर्तीराज पाटील यांनी केले तर सौ. शिल्पा मुळे यांनी आभार मानले.