सत्यनारायण पूजेसाठी तलावातील कमळाची फुले काढताना काळाचा घाला
मुरगूड ( शशी दरेकर ) : यमगे ता.कागल येथील माजी सैनिक अशोक बळवंत कोंडेकर (वय ६२) यांचा गाव तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.सत्यनारायण पूजेसाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या गाव तलावात कमळाची फुले काढण्यासाठी ते गेले असता कमळाच्या वेली व केंदाळा मध्ये ते अडकले.मोठं मोठ्यांनी ओरडून सुद्धा वेळीच कोण न आलेने ते बुडाले.कोंडेकर यांच्या या अपघाती मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळावरून व पोलीस स्टेशन मधून मिळालेली अधिक माहिती अशी रविवारी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती.त्यासाठी ते सकाळी लवकर उठून त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गाव तलावामध्ये कमळाची फुले काढण्यासाठी गेले होते.त्यांना चांगले पोहता येत होते.सकाळी सहा च्या सुमारास ते तलावामध्ये उतरले होते.
तलावाच्या मध्यभागी जाऊन त्यांनी फुले काढली.परत पाठीमागे फिरून ते काठावर येण्यासाठी प्रयत्न करू लागले पण त्यांचे पाय कमळाच्या वेली मध्ये व केंदाळा मध्ये अडकले.त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही.ते मोठं मोठ्याने ओरडत होते.त्यावेळी काठावर असलेल्या लोकांनी तात्काळ तलावात उड्या टाकून त्यांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तो पर्यंत ते बुडाले होते.
तात्काळ त्यांना बाहेर काढून प्राथमिक उपचार करून मुरगूड च्या ग्रामीण रुग्णालयात नेले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.पट्टीच्या पोहणाऱ्या माजी सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली असून याबाबतची वर्दी कौस्तुभ कोंडेकर यांनी दिली आहे. कोंडेकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातू, मुलगी, जावई, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.