मुरगुड (शशी दरेकर) : महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली, दरम्यान पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या पत्नी सौ विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते महापूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने आबिटकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सकाळी नऊ वाजता कुंभार वाड्यातून मानाच्या नागमूर्तीचे आगमन झाल्यानंतर महिलांनी दूध लाह्या साखर वाहून पूजा केली यावेळी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता देवस्थान समितीच्या वतीने दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती यामुळे भाविकांच्यातून समाधानाचे वातावरण होते भाविकासाठी एस टी महामंडळाकडून ज्यादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मुरगुड, मुधाळतिट्टा, कूर, वाघापूर या एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात आला होता.
तसेच यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी भुदरगड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी देवस्थान समितीचे सर्व सदस्य, तहसीलदार अर्चना पाटील, पी.आय.सचिन पाटील देवस्थान समितीचे अध्यक्ष बापूसाहेब आरडे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे पुजारी मधुकर गुरव, यांच्यासह सर्व पुजारी वर्ग, पुरोहित विजय स्मार्त तसेच सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.