कोल्हापूर : आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह बांधले होते. ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रात्री मी श्री. महालक्ष्मी एक्सप्रेसमधून रेल्वेने येत असताना प्रवासातच उशिरा मला ही घटना सोशल मीडियावर समजली. आगीची ती दृश्ये मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदना देणारी होती. दोन दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दुर्घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करून या नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी जास्तीत- जास्त निधीसाठी प्रयत्नशील राहू आणि हे वैभव पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेले हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करणे किंबहुना; याच्यापेक्षा अधिक चांगले करणे ही आम्हा सर्व लोकप्रतिनिधींची, सरकारची आणि समाजाची जबाबदारी आहे असे मनोगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक वैभवच…..! सन १९१२ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर उभारले होते. गुरुवारी दि. ९ रात्री उशिरा नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत बहुतांशी नाट्यगृह जळून बेचिराराख झाले.
आज शुक्रवार दि . १० पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळी साडेसात वाजताच नाट्यगृहाला भेट दिली. भस्मसात झालेल्या नाट्यगृहाची त्यांनी पाहणी केली. मुंबईवरून श्री. महालक्ष्मी एक्सप्रेसमधून येत असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर उतरताच तडक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. भीषण आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या बेचिराराख नाट्यगृहाची भग्न परिस्थिती पाहून मंत्री श्री. मुश्रीफ भावनिक झाले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फरास या प्रमुखांसह अधिकारी व नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.