पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिद्धनेर्ली ता. कागल येथील निसर्ग व पर्यावरण संघटना आणि गावतील नागरिक याच्या माध्यमातून गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी देशी वृक्षाची रोपे लावण्यात आली. सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते पिंपळ वृक्षाचे पुजन करून वृक्षारोपनाला सुरवात करण्यात आली.
गेली अनेक वर्षे सिद्धनेर्ली गावात वृक्षारोपण व संगोपन हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चालू वर्षी रस्त्याच्या दुतर्फा व शेत पाणंदीला वृक्षारोपण करताना संपूर्ण देशी वृक्षांचे यामध्ये कदंब, वड, कडूलिंब, जारूळ, फणस, चिंच, आंबा, मोहगणी, खाया, चाफा, पुत्रंजिवा, पिंपळ अशा अनेक वृक्षांचे रोपन केले. दत्त उद्यान परीसर, वैकुंठभूमि नदिघाट रस्ता, शाहू नगर पाणंद, शेरी पाणंद व कोड वसाहत आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाहू चे संचालक प्रा. सुनील मगदूम म्हणाले निसर्ग व पर्यावरण संघटनेचे मधुकर येवलुजे, भाऊसाहेब लाड, सुधीर उबाळे, शिवाजी मगदूम, विवेक पोतदार यांच्यासह सिध्दनेर्ली विद्यालय, प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांसह संत निरंकारी मंडळासह अनेक मंडळे, कोड वसाहत व गावातील अनेक वृक्ष मित्रांनी योगदान दिले. स्वागत विवेक पोतदार यांनी केले तर आभार मधुकर येवलुजे यांनी मानले.