मुरगूड ( शशी दरेकर ) : अयोध्या श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव समिती मुरगुड शहर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत शाळकरी मुलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. समितीच्या वतीने दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. लहान गट वय वर्ष ७ ते १२ आणि मोठा गट वय वर्षे १३ ते १६ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली होती.
लहान गटासाठी ऐच्छिक तर मोठ्या गटासाठी भारतीय सण आणि उत्सव असा विषय ठेवण्यात आला होता. सकाळी दहा वाजता स्पर्धेत सुरुवात झाली .तत्पूर्वी अंबाबाई देवालय परिसर आणि राम मंदिर परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता . यानंतर नाव नोंदणी करून अंबाबाई देवालयाच्या सभागृहामध्ये खालील मजल्यावरती मोठा गट तर वरील मजल्यावरती छोटा गट स्पर्धेसाठी बसवण्यात आला होता.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये 501 आणि आकर्षक शिल्ड, दृतीय क्रमांक 301 आणि आकर्षक शिल्ड तर तृतीय क्रमांक साठी रुपये 201 आणि आकर्षक शिल्ड अशी बक्षीसे ठेवण्यात आली होती रोख रक्कम बक्षीससाठी उद्धव मिरजकर यांचे तर शिल्डसाठी अक्षय पोतदार आणि सुभाष आनवकर यांचे तर सहभागी प्रमाणपत्रासाठी संकेत शहा यांचे समितीला सहकार्य लाभले.
तसेच सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेचा निकाल सोमवारी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहेत . या स्पर्धेत शिवराज विद्यालय मुरगुड, मुरगुड विद्यालय मुरगुड ,मंडलिक संस्कार भवन, लिटल मास्टर गुरुकुलम ,जीवन शिक्षण विद्यामंदिर मुरगुड नंबर एक ,शिवाजी विद्यामंदिर शाळा नंबर 2 , कन्या विद्या मंदिर, ज्ञान प्रबोधनी इंग्लिश मीडियम स्कूल इत्यादी शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. स्पर्धकांनी गुढीपाडवा, रामनवमी, क्रिसमस, दिवाळी तर लहान मुलांनी राम मंदिर ,भारतीय पर्यावरण निसर्ग चित्र, कार्टून अशी चित्रे रेखाटली होती . स्पर्धेसाठी कमिटीतर्फे कागद पुरवण्यात आला होता. या स्पर्धेचे नियोजन ओंकार पोतदार, सर्जेराव भाट, प्रकाश परिशवाड, तानाजी भराडे, अनुबोध गाडगीळ, जगदीश गुरव ,महेश कुलकर्णी, अनिल गुरव यांनी केले . स्पर्धेवेळी सर्व शाळांचे शिक्षक नागरिक आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.