कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानाने दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 19 चालकांवर मोटर वाहन कायदा व नियम अंतर्गत कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली.
प्रादेशिक परिवहन विभागाची सहा पथके यामध्ये सहभागी झाली होती. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर व जयसिंगपूर येथे या पथकांमार्फत एकाच वेळी तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण 19 दुचाकी स्वार दारु पिऊन वाहन चालवताना आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
या मोहिमेमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक राहुल नलवडे, उदय केंबळे, किरण खोत, सागर भोसले, विजयसिंह भोसले, विजय मोरे, अभिजीत पोटे व शहर वाहतूक शाखा कोल्हापूर व इचलकरंजीचे पोलीस निरीक्षक श्री.मोरे व राजू पाटील तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सहभागी झाले होते. 31 डिसेंबर रोजीही शहरांमध्ये सायंकाळपासून पहाटेपर्यंत ही तपासणी मोहीम चालू राहणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी दिली.