कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत “नवदुर्गा महिला रॅली” आयोजित करण्यात आली आहे. पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार, वकील, नर्स, प्रशासकीय अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील महिला, विद्यार्थिनी तसेच विविध संस्था, संघटनांतील महिलांचा सहभाग असणारी ही “नवदुर्गा महिला रॅली” नारी शक्तीचं दर्शन घडवणार आहे.
ही रॅली म्हणजे महिलांसाठीची उत्साहपूर्ण संधी आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचा प्रयत्न आहे. या महिला रॅलीला जिल्ह्यातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
रॅलीचे स्वरुप व थोडक्यात माहिती- महिला रॅलीमध्ये सहभागी होताना सर्व मुली आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे. या रॅलीत प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल असे दोन ग्रुप असणार आहेत. प्रोफेशनल ग्रुप मधून तीन क्रमांक व नॉन प्रोफेशनल मधून तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत.
प्रोफेशनल ग्रुपमध्ये सहभागी होताना त्यांचे प्रोफेशन (नोकरी, व्यवसाय) कोणते आहे हे सर्वांना ओळखेल अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा पेहराव करावयाचा आहे. नॉन प्रोफेशनल मध्ये महिला कोणताही साजेसा आणि पारंपरिक पेहराव करु शकतात. रॅली मध्ये कोणताही सामाजिक विषय घेऊन सहभागी होवू शकतात. ( उदा. पाणी वाचवा, पर्यावरण जनजागृती, मुलगी वाचवा, स्वच्छ सुंदर कोल्हापूर) तसेच त्या त्या क्षेत्राविषयी जनजागृती देखील करु शकतात.
नॉन प्रोफेशनल क्षेत्रातील महिलांनी सांस्कृतिक आणि सामाजिक विषय निवडावा. सर्व संघांनी जनजागृतीपर विषय निवडावा. कोणत्याही वादातीत विषयाची मांडणी, भाषा, शब्द असू नयेत. प्रत्येकी एका ग्रुप मध्ये कमीत कमी 20 महिला 10 दुचाकी वाहनासह उपस्थित असणे आवश्यक आहे. रॅलीत सहभागी महिलांनी आपली दुचाकी पर्यावरण पूरक पद्धतीने सजवून सहभागी व्हायचे आहे. पहिला क्रमांक – 10 हजार रुपये, दुसरा – 7 हजार रुपये, तिसरा – 5 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
सर्व महिलांनी या नवदुर्गा रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. रॅलीत सहभागी होवू इच्छिणाऱ्या महिलांनी दसरा चौक येथे सकाळी 8 वाजता उपस्थित रहावे.