परिवहन विभाग व शाळा प्रशासनाचा सक्रिय सहभाग
कोल्हापूर, दि. 17 : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘100 दिवस 100 शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम जोमाने सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्या समन्वयाने ही मोहीम राबविली जात आहे.

यात हेल्मेटचा वापर, रस्ता चिन्हे, अपघातग्रस्तांना मदत, पादचारी व सायकलस्वार सुरक्षा तसेच सुरक्षित वाहन चालविण्याचे कौशल्य अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले जात आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने व निता सूर्यवंशी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांनी आतापर्यंत जिल्ह्यातील 15 शाळांमध्ये यशस्वी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

प्रत्येक कार्यक्रमास शाळा प्रशासनाकडून उत्तम सहकार्य मिळत असून, सरासरी 500 ते 600 विद्यार्थी या प्रबोधनाचा लाभ घेत आहेत. जुलै 2025 अखेरपर्यंत किमान 100 शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन व्यापक स्तरावर जनजागृती करण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल.