प्रश्न : साहेब, तुमच्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल काही सांगाल का ?
हसन मुश्रीफ : माझा जन्म २४ मार्च १९५३ रोजी रामनवमीच्या दिवशी झाला. माझे प्राथमिक शिक्षण श्रीमंत हिंदूराव घाटगे विद्यालयात झाले आणि माध्यमिक शिक्षण श्री शाहू हायस्कूल, कागल येथे झाले. त्यानंतर मी राजाराम कॉलेजमधून बी.ए. ऑनर्स (सोशियोलॉजी) ही पदवी घेतली. बालपणात माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते, त्यांना आम्ही वेळेत घरी आलेले आवडायचे. मला लहानपणापासूनच क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळण्याची प्रचंड आवड होती.

प्रश्न: तुम्ही अल्पसंख्याक कुटुंबातून येऊनही तुमच्या मतदारसंघात ७५० हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, हे कसं शक्य झालं?
हसन मुश्रीफ: माझा मतदारसंघ हा प्रामुख्याने हिंदू बहुल आहे. माझे शिक्षण मराठीतून झाले असून माझे बहुतांश मित्रही याच समाजातील आहेत. लहानपणापासून आम्ही एकत्र सण साजरे केले—गणपती असो वा पाडव्याला पोळ्या खायला जाणे असो, आम्ही नेहमी एकत्र राहिलो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मतदारसंघात मंदिर उभारणी किंवा जीर्णोद्धाराचा प्रश्न आला, तेव्हा मी त्यात हिरिरीने भाग घेतला. आज माझ्या मतदारसंघातील अनेक मंदिरे ही उत्कृष्ट दर्जाची असून काहींच्या समारंभासाठी मी हेलिकॉप्टरने देखील फुले उधळली आहेत.
प्रश्न: तुमचे ‘जनता दरबार’ खूप प्रसिद्ध आहेत, त्यामागील नेमकी संकल्पना काय आहे?
हसन मुश्रीफ: केवळ भौतिक विकास करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. लोकांना नोकरी, शासकीय कार्यालयातील कामे, आणि विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात अडचणी येतात. मी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सकाळी ५ वाजता उठून, पावणे सहाला कामाला सुरुवात करतो. रोज शेकडो लोक मला भेटतात. मी लोकांच्या कामासाठी थेट अधिकाऱ्यांना फोन करतो. शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही, हेच माझ्या ‘जनता दरबार’चे वैशिष्ट्य आहे.
प्रश्न: तुमची पहिली विधानसभा निवडणूक तुम्ही हरलात, पण तरीही तुम्ही खचला नाही आणि पुन्हा निवडून आलात, तो अनुभव कसा होता?
हसन मुश्रीफ : पहिल्या निवडणुकीत माझा केवळ ७ हजार मतांनी पराभव झाला होता. पण मी पराभवाच्या दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा कामाला लागलो. प्रतिस्पर्ध्यांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीच्या गुलाल अंगावर असतानाच मी सकाळी चालत लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या. पुढे ६ ते १० महिन्यांतच पोटनिवडणूक लागली आणि मी मोठ्या मताधिक्याने पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आलो. चिकाटी न सोडल्यामुळेच मला हे यश मिळाले.
थोडक्यात रंजक गोष्टी:
आवडता चित्रपट आणि गाणे: त्यांचा आवडता चित्रपट ‘शोले’ असून ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे त्यांचे आवडते गाणे आहे.
पॉलिटिक्समधील करिअर: लहानपणी ते त्यांच्या शिक्षकांना नेहमी सांगायचे, “मी आमदार होणार, राज्याचा मंत्री होणार आणि केंद्रातही मंत्री होणार!” त्यातील दोन स्वप्ने त्यांनी पूर्ण केली आहेत.