कागल (सलीम शेख ) : काही दिवसांपूर्वी गहिनीनाथ समाचार या वृत्तपत्रामध्ये ‘कागल येथील दुधगंगा नदीच्या पुलावर पडलेला खड्डा’ या शीर्षकाखाली एक बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने कार्यवाही केली आहे.
दुधगंगा नदीवरील या पुलावर अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती, त्यामुळे स्थानिक नागरिकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती.

गहिनीनाथ समाचारमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने या समस्येची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने पुलावरील खड्डा सिमेंट-खडीच्या साहाय्याने भरून काढला आहे. यामुळे पुलावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून, अपघाताचा धोका टळला आहे.
या त्वरित कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. वृत्तपत्राने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे काम वेळेत पूर्ण झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.