कोल्हापूर, दि.24 : मिशन गोल्डअंतर्गत जिल्ह्यातील खेळाडूंकरीता ऑलिंपिक स्पर्धेत समविष्ट असलेले खेळ व भारतीय व महाराष्ट्र ऑलिंपिक कमिटीची मान्यता असलेल्या संघटनांच्या क्रीडा प्रकारांपैकी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व संघटना, (ऑलिंपिक स्पर्धेत समविष्ट असलेले खेळ) वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्यप्राप्त व सहभागी खेळाडू तसेच वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त (शासकीय सेवेत नसलेल्या) खेळाडूंची यादी कार्यालयास सादर करावी. ज्या क्रीडा प्रकारात वरिष्ठ आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत जास्ती- जास्त प्राविण्य व सहभाग असेल अशा किमान १० क्रीडा प्रकारांचा समावेश मिशन गोल्ड या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
भारतीय ऑलिंपिक कमिटीची व महाराष्ट्र ऑलिंपिक कमिटीची मान्यता असलेल्या अधिकृत क्रीडाप्रकारांशी संबंधित क्रीडासंघटनांनी सन २०१७-१८ पासुन ते २०२१-२२ पर्यंत वरिष्ठ आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंची माहिती विहीत नमुन्यात प्रमाणपत्राच्या सत्य प्रतीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मंगळवार दि. 30 मे २०२२ पर्यंत सादर करावी, असे आवाहन डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.