श्रमिक बेघर संघटनेचा ८ वर्षांचा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर; नगरपरिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन सादर
मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगूड ता . कागल येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुरगूड शहरातील बेघरांच्या हक्काच्या जागेचा आणि घरांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मुरगूड शहर श्रमिक बेघर संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत, नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील आणि मुख्याधिकारी (सी.ओ.) अतिश वाळुंज यांनी बेघरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
प्रशासकीय इमारतीत रंगली चर्चा:
मुरगूड शहर श्रमिक बेघर संघटनेचे अध्यक्ष श्री. सिकंदर (पापा) जमादार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपरिषदेत धाव घेतली. यावेळी बोलताना अध्यक्ष सिकंदर जमादार यांनी स्पष्ट केले की, हक्काची जागा आरक्षित असूनही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. ही बाब सरकारी धोरणाला काळीमा फासणारी असून, बेघरांना न्याय मिळण्यास विलंब होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. आरक्षित जागा असूनही प्रशासकीय दीरंगाईमुळे गोरगरिबांना हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित ठेवले जात आहे.
यावेळी नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई आनंदा मांगले, नगरसेवक सुहास खराडे, नगरसेवक एस. व्ही. चौगले सर, तसेच दीपक शिंदे आणि राजू कांबळे यांनीही सहभाग नोंदवला.
८ वर्षांच्या संघर्षाला यश येणार?
१४ डिसेंबर २०१७ पासून बेघरांना शासकीय योजनेतून जागा व निवारा मिळण्यासाठी हा लढा सुरू आहे. नगरपरिषदेच्या २०२१ मधील पत्रानुसार जागा आरक्षित असूनही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले होते. मात्र, आजच्या भेटीत प्रशासनाने या जागेचे भूसंपादन करून त्यावर घरे बांधून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे मान्य केले आहे. “सर्वांसाठी घरे” हे धोरण राबवण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवेदन देताना संघटनेच्या वतीने सिकंदर जमादार (पापा), जयवंत हावळ सर, शिकंदर जमादार (पत्रकार), विजय घाटगे, शंकर वर्मा यांनी आक्रमकपणे बेघरांच्या व्यथा मांडल्या. याप्रसंगी महिला आघाडीच्या दिलशाद मुजावर, अलका सुतार, शोभा शेटके, स्मिता भिल्लवडेकर, ललिता उपादे यांच्यासह मोठ्या संख्येने बेघर नागरिक उपस्थित होते.
आश्वासनामुळे आशा पल्लवित:
नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील आणि सी.ओ. अतिश वाळुंज यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बेघरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाने शब्द पाळल्यास शेकडो कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे छत मिळणार आहे. आता मुरगूड मधील १३५ बेघर नागरिकांना आपली हक्काचे घरे मिळणार का? याकडे मुरगूड शहरासह पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
