विद्यार्थांनी एसटीच्या अधिकाऱ्यानां धरले धारेवर
मुरगूड ( शशी दरेकर ): विद्यार्थ्यांच्या एसटी बसगाड्यांच्या गैरसोयी संदर्भात आज मुरगूडमध्ये एस टी रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. या आंदोलनामूळे चार तास एस टी. वाहतूक ठप्प होती. अखेर आंदोलक व विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत अधिकाऱ्यांनी एसटी बसगाड्यांच्या मागण्या मान्य करून संबधित मार्गावर आजपासूनच गाडया सुरू करीत असल्याचे तर इतर बसेस आठ दिवसात सुरु करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मुरगूडला दररोज शाळा-महाविद्यालयांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत एस. टी. बसगाडया नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
या संदर्भात निवेदन व पत्रव्यवहार करून सुद्धा एसटीने त्याची दखल घेतली नाही. यावर विद्यार्थी व पालकांनी २५ जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता पण एसटी अधिकाऱ्यांनी आश्वासन देत वेळ मारुन नेली. महिना झाला तरी एसटी बसगाडया सुरु न झाल्याने येथील शिवराज कनिष्ठ महाविद्यालयाचे आंदोलक विद्यार्थी व शिक्षकांनी आज याप्रश्नी एसटी रोको आंदोलन केले. सकाळी साडेसात वाजल्यापासून शिवराजच्या हजारो विद्यार्थ्यांनी एस.टी. बसस्थानकाला वेढा देत घेराव घातला. व एसटी प्रशासनाच्या गलथानपणाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यामूळे सकाळी ७ वाजले पासून चार तास एसटी वाहतूक ठप्प होती. आंदोलन स्थळी गारगोटी कागल व राधानगर आगार व्यवस्थापक व कोल्हापूर विभागीय अधिकारी येताच त्यांना आंदोलक विद्यार्थी-पालक व शिक्षकांनी घेराव घातला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना चांगलेच धारेवर धरले. यामूळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर अधिकाऱ्यांनी एसटी बसगाड्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विद्यार्थी – पालक व शिक्षक प्रतिनिधी यांच्यावतीने प्राचार्य पी.डी माने, उपप्राचार्य प्रा. रविन्द्र शिंदे, गजानन मडिलगेकर, कॉं. बबन बारदेस्कर, प्रदीप वर्णे, प्रा. सुनिल डेळेकर, प्रा. बी. डी. चौगले यांनी एसटी मागण्या विषयी भाषणातून आपल्या तीव्र भावना मांडल्या.
एसटीतर्फें गारगोटी आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे , राधानगर आगार व्यवस्थापक सागर पाटील , कागल आगारच्या सौ .आर एस ढेरे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला .
…..