कोल्हापूर, दि. 3 : ‘सुकन्या समृध्दी योजना’ खाते उघडण्यासाठी दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष मोहिम ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांनी दि. 9 व 10 रोजी जवळ्च्या पोस्ट ऑफ़ीसमध्ये जाऊन अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे.
‘सुकन्या समृध्दी योजना’ ही लोकाभिमुख असून, महिला सक्षमीकरण व आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून प्रत्येक व्यक्तिपर्यंत त्याची माहिती पोहचवण्याच्या हेतुने डाक विभाग कोल्हापूर मार्फत दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात खाते उघडण्याच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून 24 तासात राष्ट्रीय पातळीवर 7.5 लाख खाती उघडण्याचे लक्ष्य आहे, असेही श्री. इंगळे यांनी कळविले आहे.
सुकन्या समृध्दी योजनेची माहिती
जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही योजना केंद्र सरकारने मुलींच्या नावाने सुरू केलेली योजना आहे. यामध्ये, मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रक्कम मिळते. अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते आणि मुलींच्या नावाने सुरू असलेल्या या योजनेत तुमचे पैसे 3 पट वाढण्याची हमी आहे. अशा परिस्थितीत या दिवाळीत तुम्ही तुमच्या मुलींना ही विशेष योजना भेट देऊ शकता, जेणेकरून आर्थिक अडचणींवर काही प्रमाणात नक्कीच मात करता येईल.
गुंतवणुकीतून चांगला परतावा
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याज दर वार्षिक 7.6 टक्के आहे. योजनेचा व्याजदर पीपीएफ (PPF),एफडी (FD),एनएससी (NSC), आरडी (RD), मासिक उत्पन्न योजनेपेक्षा चांगले व्याज मिळते. विशेष बाब म्हणजे या योजनेची मॅच्युरिटी 21 वर्षे आहे, परंतु पालकांना यामध्ये केवळ 14 वर्षांची गुंतवणूक करावी लागेल. बाकी वर्ष व्याज वाढतच राहते. या योजनेत गुंतवलेली रक्कम मॅच्युरिटीनंतर 3 पट असेल. सध्याच्या व्याजदरावर या योजनेद्वारे कमाल 64 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उभारता येईल.
मासिक 5000 रुपये गुंतवणूक केल्यास
सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत.
या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करता येतात. किमान 250 रुपये जमा करता येतात.
जर हे व्याजदर कायम राहिल्यास आणि 14 वर्षांसाठी तुम्ही दरमहा 5000 रुपये किंवा वार्षिक 60 हजार रुपये गुंतवले. 15 वर्षांसाठी, 60 हजारांच्या वार्षिक गुंतवणुकीवर तुमच्याकडून एकूण योगदान 9 लाख रुपये असेल.
यानंतर, पुढील 6 वर्षांसाठी, या रकमेवरील परतावा वार्षिक 7.6 टक्के चक्रवाढ होईल.
21 वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 25,46,062 रुपये असेल.
खाते उघडण्यासाठी काय करावे लागेल
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करा .
यासाठी मुलीचा जन्म दाखला असणे आवश्यक आहे. मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे.
पालकांचा ओळखपत्रही आवश्यक असेल. ज्यामध्ये पॅन कार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट अशी कोणतीही कागदपत्रे अर्ज करू शकतात.
पालकांना पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रे देखील सादर करावी लागतील. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वीज बिल किंवा रेशन कार्ड वैध आहे.
बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल.
खाते उघडल्यानंतर खातेदाराला पासबुकही दिले जाते.
2 पेक्षा जास्त मुलींचे खाते उघडायचे असल्यास जन्म प्रमाणपत्रासह प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे.
या योजनेचे फायदे
सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. जर मुलगी 18 वर्षांची झाली आणि तिला तिच्या अभ्यासासाठी किंवा तिच्या लग्नासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता. या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये जमा करता येतात.