बाचणी येथील रखडलेल्या पुलाच्या कामासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा इशारा

बाचणी (सलीम शेख ) :

Advertisements

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि करवीर तालुक्यांना जोडणाऱ्या दुधगंगा नदीवरील बाचणी-वडशिवाले दरम्यानच्या नवीन पुलाचे काम गेली चार वर्षांपासून रखडले असून, हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली आहे. हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि तालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी दिला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन सादर केले आहे.

Advertisements


निवेदनानुसार, बाचणी येथे जुन्या पुलाला पर्यायी म्हणून नवीन पूल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सध्याचा पूल सुमारे ८० वर्षांपूर्वीचा असून, पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे त्याला काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच, पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे.
प्रशासनाला जाग येणार कधी?

Advertisements


शंभरीकडे वाटचाल करत असलेल्या या जुन्या आणि जीर्ण पुलावरून सध्या धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू आहे. नवीन पुलाचे काम चार वर्षे रखडल्यामुळे मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार काय, असा सवाल उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी उपस्थित केला.
दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली गेल्याने गारगोटी-कोल्हापूर बाचणीमार्गे वाहतूक ठप्प होते. यंदा पावसाळ्यापूर्वी जुन्या पुलावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते, परंतु तेही पावसाने वाहून गेल्याने पुलावरून वाहतूक करणे अधिकच धोकादायक झाले आहे. एसटी फेऱ्याही बंद झाल्याने पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.


शिवसेना ठाकरे पक्षाने संबंधित विभागाने या प्रकरणी लक्ष घालून जुन्या पुलाची दुरुस्ती आणि नवीन पुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. आजच्या आंदोलनामुळे पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबली होती. कागल पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचे आवाहन केले आणि वाहतूक पूर्ववत केली.
यावेळी डॉ. के. एम. पाटील, चंद्रकांत पाटील, निवृती पाटील, प्रकाश पाटील, यशवंत पाटील, जीवन कोळी, युवराज ससे, उत्तम पाटील, पिंटू गुरव, अरुण पाटील, विजय जाधव, अजित बोडके, किरण दळवी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!