
मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा मंत्री नाम.दत्तामामा भरणे, उच्चशिक्षण मंत्री नाम.चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे हा पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.
वयाच्या ३२ व्या वर्षी नंदिनीला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासाहेब लवटे यांनी तिला कुस्तीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे.

याशिवाय माझी खासदार संजय दादा मंडलिक,आखाड्याचे अध्यक्ष, वस्ताद सुखदेव येरुडकर, ॲड.वीरेंद्र मंडलिक, आणि वेळोवेळी तिला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक आणि हितचिंतक यांचे तिच्या या दैदिप्यमान यशा मध्ये मोठे योगदान आहे.

तिच्या आईने कठीण परीस्थितीत सुद्धा तिला मोठी साथ दिली आहे. मुरगूड येथे लोक नेते स्व. सदाशिवराव मंडलिक तथा साई संकुल,नगरपरिषद तसेच इतर क्रीडा व कुस्ती शौकीन यांच्या तर्फे तिचा सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याने फोन व सोशल मीडियावर तिचे सातत्याने अभिनंदन होत आहे.