बामणी येथे ड्रोन तंत्राद्वारे फवारणी प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
व्हनाळी: सागर लोहार
ऊसाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना शाहू कारखान्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. बामणी ता.कागल येथे शाहू साखर कारखान्यामार्फत ज्ञानदेव तारदाळे यांच्या ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकवेळी ते बोलत होते.या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी “शाहू”ची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल व देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल समरजितसिंह घाटगे यांचा शेतकरी व कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कार तसेच बामणी ता. कागल येथे घेण्यात आलेल्या ई श्रम नोंदणी कार्ड महोत्सवातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कार्डचे वाटप केले.
श्री. घाटगे पुढे म्हणाले,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यामार्फत ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्याची परंपरा निर्माण केली आहे. तीच पुढे चालविताना शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबविण्यात येत आहेत.
ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक उपक्रमशील प्रयोग राबवित असताना ड्रोनद्वारे खत फवारणी तंत्रास प्रोत्साहन दिले आहे.
त्यामुळे ड्रोनद्वारे “शाहू”च्या शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच सीएनजी चलित ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिकेही शाहूच्या कार्यक्षेत्रात घेतले आहे.त्यासाठीसुद्धा प्रोत्साहन देण्याचे धोरण राहील. यावेळी शंकरराव मेथे भिकाजी खिरूगडे,राहूल मगदूम,तानाजी तारदाळे, यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे संचालक डॉ.डी एस पाटील, सचिन मगदूम, भाऊसो कांबळे, राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील, धैर्यशील इंगळे, नारायण पाटील, दिनकर वाडकर, नामदेव बल्लाळ, पी.डी.चौगुले, आदी उपस्थित होते.
स्वागत ऊस विकास अधिकारी के.बी.पाटील यांनी केले. संचालक प्रा सुनील मगदूम यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांची कृतज्ञता…
शाहू साखर कारखान्यामार्फत राजे समरजितसिंह घाटगे यांनी यावर्षी महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या ऊसाची तोडणी अग्रक्रमाने करण्याचे जाहीर करून त्याप्रमाणे सर्वप्रथम कार्यवाही केली व या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच हंगामाआधी एकरकमी एफआरपी देण्याची सर्वप्रथम घोषणा करून ऊसदराची कोंडी फोडून यावरून होणारा संघर्ष टाळला होता. तसेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ऊस पिकासाठी अतिरिक्त खतमात्रा पुरवल्या होत्या. या शेतकरीहिताच्या निर्णयाबद्दल ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते श्री. घाटगे यांचा सत्कार करून शेतकर्यांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली.